घटनास्थळी मोबाईल, दुचाकी, दारूची बाटली अन् विषाचा डबा
बिडकीन, (प्रतिनिधी) : बिडकीन डीएमआयसी औद्योगिक परिसरात २ तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दोघांचे मोबाईल, दुचाकी, विषारी इंडोसल्फान औषधाचा डबा, पाणी अन् विदेशी दारूच्या बाटल्या असे साहित्य आढळून आले. दोन्ही मयतांची ओळख पटली आहे. ते हॉटेल कामगार असल्याचे समोर आले आहे.
प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार दिसत आहे. काल (दि. २८) रोजी पहाटे नेहमीप्रमाणे काही नागरिक डीएमआयसी
परिसरात व्यायाम करण्यासाठी गेले असता त्यांना परिसरामध्ये एकाच ठिकाणी २ तरुणांचे मृतदेह आढळून आले.
मृतदेहाजवळ एम. एच.२० एफ. एक्स. ६८४५ या क्रमांकाची हीरो होंडा कंपनीची दुचाकी उभी होती. जवळच विदेशी दारूची बाटली, पाण्याची बाटली, विषारी मोबाईल औषधीचा डबा (इंडोसल्फान) आणि दोघांचेही आढळले.
घाबरलेल्या नागरिकांनी बिडकीन पोलिसांना माहिती दिली. सहायक फौजदार अशोक सोकटकर व संजीवन कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. तपासाची चक्रे फिरताच दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. एकाचे नाव सचिन काकासाहेब झिरपे (२३, रा. कडेठाण ता. पैठण) हल्ली मुक्काम सूर्य उद्योगनगर, बिडकीन) तर दुसरा सचिन भगीरथ आरगडे (२९, रा. धनगरपिंपरी ता. अंबड जि. जालना) आहे.
दोन्ही तरुण हॉटेल कामगार असल्याची माहिती मिळाली. दोघांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत नाहीत. या दोघांना कधीच एकत्र पाहिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे असताना सोबतच त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भास्करराव खुळे, पोलीस कर्मचारी सोमनाथ जाधव व गणेश खंडागळे पुढील तपास करीत आहेत.














